यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे)
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान
योजनेची माहिती-
- ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.
- या योजने मध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते. उदा. पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.
- ट्रॅक्टर व इतर उच्च किमतीच्या औजारांकरीता (ट्रॅक्टर/कंबाइन हार्वेस्टर/ड्रोन )शेतकरी यांना वैयक्तिक लाभ देय नाही. औजारे बँक यामधून लाभ घेता येतो.
- वनपट्टाधारक वैयक्तिक लाभधारकांना अनुसूचित जमाती प्रवर्गामधून ९० टक्के अनुदान आहे.
- अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान ६ वर्ष आणि ट्रॅक्टर चलीत औजारांची किमान ३ वर्ष विक्री करता येणार नाही.
- वैयक्तिक लाभासाठी ट्रॅक्टर या घटकासाठी अनुदान देय नसल्याने ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असेल अशाच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलीत औजारांचा लाभ देय राहील. त्यासाठी ट्रॅक्टरच्या RC BOOK ची सत्यप्रत द्यावी लागते. ट्रॅक्टर वगळता केवळ औजारे अनुदानावर घ्यावयाची असल्यास किमान ३ ते ४ औजारे अथवा रु. १ लाख अनुदान रकमेत जेवढी औजारे घेता येतील तेवढी यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेत एका वर्षात अनुदान देय राहील. ज्या औजारांसाठी अनुदानाची रक्कम १ लाख पेक्षा जास्त आहे अशा औजारांसाठी एका वर्षात फक्त एकाच औजारासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.
विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा यांना 50 टक्के
अनुदान - इतर लाभार्थी यांना 40 टक्के
अवजारे निहाय अनुदान पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
अनुदान कोणत्या अवजारांना मिळते-
पॉवर टिलर, स्वयंचलीत यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलीत यंत्र व अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलीत अवजारे, प्रक्रिया युनिट, औजारे बँक इ .
आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात-
7/12 व 8 अ, बँक पास बुक, आधार कार्ड, यंत्राचे कोटेशन, परिक्षण अहवाल, जातीचा दाखला.
अर्ज कुठे करावा -
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.
शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात. या संकेत स्थळावर "शेतकरी योजना" हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना "वैयक्तीक लाभार्थी" तसेच "शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था" म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे. आणि त्यानंतर लॉगइन करुन आपल्याला आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.
शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील "तक्रार/सुचना" या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकतात.
लाभार्थी निवड कशी केली जाते?
प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल. ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.
त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.
लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहे का?
होय. 30 टक्के निधी हा महिला खाते दारांसाठी तर 3 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहे. परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाही तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांचे साठी वापरला जातो.
पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी औजारे खरेदी कोठून करावीत ?
पुर्वसंमती मिळाल्या नंतर लाभार्थी यांनी खुल्या बाजारतील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेते यांचे कडून यंत्र/औजारे विहित मुदतीत खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी केले नाही तर पुर्वसंमती रद्द होवू शकते. लाभार्थीं यांनी खरेदी करावयाची औजारे केंद्रीय तपासणी संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केलेली असणे बंधनकारक असुन त्यांनाच अनुदान देय आहे. या साठी लाभार्थी यांनी विक्रेते यांचेकडून सदर यंत्र/औजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेल्या परिक्षण प्रमाणपत्राचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. औजारे खरेदी करताना त्यावर परिक्षण अहवाल व मॉडेल क्रमांक एम्बॉस केलेला आहे का याची खात्री करुन यंत्र/औजार खरेदी करावे.
तसेच ट्रॅक्टर , पॉवर टीलर, रिपर, रिपर कम बाइन्डर, पैडि ट्रान्सप्लांटर, थ्रेशर, पॉवर वीडर या औजारांचे बाबतीत ही औजारे खरेदी करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. ही औजारे केंद्र शासनाच्या यादीतील नमुद मॉडेल/मेकचीच असली पाहिजेत. त्यांनाच अनुदान देय आहे. मात्र या केंद्र शासनाच्या यादीतील औजारे खरेदी केली तर त्याबाबतचा परिक्षण अहवाल/प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
केंद्र शासन मान्यता प्राप्त ट्रॅक्टर/पॉवर टीलर यादी-
औजारे तपासणी साठी केंद्रीय तपासणी संस्था कोणत्या आहेत?
1. केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था(CMFTTI) बुधनी
2.उत्तर क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), हिस्सार
3. दक्षिण क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (SRFMTTI), गार्लैंडिन
4. उत्तर पुर्व क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), बीश्वनाथ चारीअली, आसाम.
यंत्र/ औजारे खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे?
यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावी. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल. देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. अनुदान जीएसटी सह आहे.
अवजारे बँक साठी अनुदान आहे का?
होय. कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ४० टक्के किमान ४ लाख कमाल १०० लाख रु.अनुदान आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना माफक दराने (त्या भागात प्रचलीत दरापेक्षा २० टक्के दर कमी)अवजारे भाडे तत्वावर देणे अपेक्षित आहे.
यासाठी पात्र लाभार्थी- ग्रामीण उद्योजक, DAY/NRLM अंतर्गत महिला बचत गट,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,प्राथमिक कृषी सहकारी संस्था,शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था यांना हे अनुदान दिले जाते.
रु. १० लाखावरील खरेदीसाठी बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. अनुदान क्रेडिट लिंकड बैक एन्डेड़ स्वरुपात बँकेच्या कर्ज खात्यावर जमा केले जाईल. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी ५ वर्षापेक्षा कमी नसावा. अनुदानावर मिळणारी औजारे पुढील किमान ६ वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
ट्रॅक्टर समवेत किमान ३ औजारे घेणे आवश्यक. ट्रॅक्टर स्वतः:चा उपलब्ध असल्यास इतर किमान ३ औजारे घेणे आवश्यक.
कृषी औजार बँके ची सेवा पुरवण्याची क्षमता किमान १० हेक्टर प्रती दिवस आणि किमान ३०० हेक्टर प्रती हंगाम असणे बंधनकारक आहे.