Total Pageviews

सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ व रबी हंगाम २०२५-२६ साठी

सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना
खरीप हंगाम २०२५ व रबी हंगाम २०२५-२६ साठी



१.या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत -

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे.
  • खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात.
  • या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे  पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते.
  • सदरची योजना ही १२ जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन २०२५-२६ या वर्षी कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे
  • योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळख पत्र (AgriStack Farmer ID)असणे अनिवार्य आहे. 
  •  पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई -पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. 
२ . पिक विमा कोणत्या पिकांसाठी लागू आहे-


खरीप हंगाम-
भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका, भुईमूग, कारळे, तिळ,
सोयाबीन, कापूस, कांदा.


रबी हंगाम- गहू (बागायत), रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रबी कांदा.


३. विमा हप्ता किती भरावा लागेल-


खरीप हंगामासाठी २ टक्के,

रबी हंगामासाठी १.५ टक्के

खरीप व रबी हंगामातील नगदी पिकांसाठी- ५टक्के


यापेक्षा जास्त विमा हप्त्याची रक्कम केंद्र शासन व राज्य शासन भरते.  
     

४.विमा संरक्षणाच्या बाबी -

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील.


५. कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी-


जिल्हा समूह क्रमांक 

समाविष्ट जिल्हे 

नियुक्त केलेली विमा कंपनी (१ वर्षासाठी) 

१ 

अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपुर 

भारतीय कृषि विमा कंपनी 

मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स,मरोळ मरोशी रोड, मरोळ , अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९ 

ईमेल- pikvima@aicofidia.com

२ 

सोलापुर, जळगाव, सातारा 

३ 

परभणी, वर्धा, नागपुर, 

४ 

जालना, गोंदिया, कोल्हापुर 

५ 

नांदेड़, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 

६ 

छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड 

७ 

वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार 

८ 

हिंगोली, अकोला, धुळे , पुणे 

९ 

यवतमाळ , अमरावती, गडचिरोली 

१० 

धाराशिव 

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.

माणिकचंद आयकॉन , ३ रा मजला, प्लॉट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन , पुणे-४११००१ 

ईमेल- ICICILOMPMFBYMH@icicilombard.com

११ 

लातूर 

१२ 

बीड 


६. नुकसान भरपाईचे दायित्व-

या वर्षापासून या योजने मध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे . सदरची योजना ही १२ जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन २०२५-२६ या वर्षी कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्ता रकमेच्या ११० टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व त्यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल. जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करेल.
उदा.- जिल्हा समूहातील विमा संरक्षित रक्कम-१०००, बर्न कॉस्ट -१५ टक्के , बर्न कॉस्ट नुसार एकूण विमा हप्ता रक्कम- १०००x १५%= १५०. विमा कंपनीचे दायित्व- १५० x ११० टक्के= १६५ रु.
विमा कंपनीने दिलेला विमा हप्ता दर -१० टक्के, विमा हप्ता दरानुसार एकूण जमा विमा हप्ता रक्कम- १००० x १०%= १००. विमा कंपनीचे दायित्व- १०० x ११० टक्के= ११० रु.
विमा कंपनीचे जास्तीत जास्त दायित्व- १६५ रु.

१. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई २०० रु. असेल तर विमा कंपनी १६५ रु. अदा करील व उर्वरित ३५ रु. राज्य शासन अदा करील.


२.   जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई १६० रु. असेल तर विमा कंपनी १६० रु. नुकसान भरपाई अदा करील.


३. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ९५ रु. असेल तर विमा कंपनी ९५ रु. नुकसान भरपाई अदा करील. व उर्वरित ५ रु. स्वतः:कडे ठेवेल.


४. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ५० रु. असेल तर विमा कंपनी ५० रु. नुकसान भरपाई अदा करील. विमा कंपनी २० रु. (एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के म्हणजेच १००x २०%) स्वतः:कडे ठेवेल व उर्वरित ३० रु. राज्य शासनास परत करील.


७. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चीत करणे.

जर एखाद्या निर्धारीत क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्या वर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे गृहीत धरण्यात येईल. 

उंबरठा उत्पादन = हंगामातील मागील ७ वर्षापैकी सर्वोत्तम अशा ५ वर्षाचे सरासरी उत्पादन x ७० टक्के (जोखीम स्तर)


भात सोयाबीन ,कापुस व गहू या पीकांकरीता चालु वर्षाचे सरासरी उत्पादन निश्चित करताना पिक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन व तांत्रिक उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन सरासरी उत्पादन निश्चित करण्यात येते. 

भात सोयाबीन व कापुस या पीकांकरीता

सरासरी उत्पादन =(पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त उत्पादन x ०.५० ) + (तांत्रिक उत्पादन x ०.५० )

उदाहरणार्थ -

पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त उत्पादन= १००० किलो / हेक्टर 

तंत्रज्ञानावर आधारीत प्राप्त उत्पादन = १५०० किलो/हेक्टर 

 सरासरी उत्पादन = (१००० x ०.५० ) + (१५०० x ०.५० )= ५०० + ७५० = १२५० किलो/हेक्टर 

तंत्रज्ञानावर आधारीत सरासरी उत्पादन निश्चित करताना YES- TECH प्रकल्पाअंतर्गत विमा क्षेत्र घटक स्तरावर प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येईल. सदरची आकडेवारी वेळेत उपलब्ध न झाल्यास पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी सरासरी उत्पादन निश्चित करताना ग्राह्य धरण्यात येईल.


सर्व पिकांसाठी नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र =  



उंबरठा उत्पादन - चालु वर्षाचे सरासरी उत्पादन  

---‐---------------------------------------—------------- x विमा संरक्षित रक्कम(रु. प्रति हे.)

          उंबरठा उत्पादन 




६.आवश्यक कागदपत्रे-


7/12, आधार कार्ड,बँक पासबूक प्रत, पिकाची पेरणी बाबत स्वयंघोषना पत्र,
भाडेपट्टा करार असल्यास करारनामा / सहमतिपत्र.  



७. योजनेचा हप्ता कुठे भरावा-


आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था,
तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.                      


८. योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख खरीप पिकांसाठी कोणती आहे ?

३१ जुलै २०२५



योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख रबी पिकांसाठी कोणती आहे ?


रबी ज्वारी- ३० नोव्हेंबर २०२५

गहू बागायत, हरभरा, कांदा - १५ डिसेंबर २०२५

उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग- ३१ मार्च २०२६




अधिक माहिती साठी-