एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत-
ड्रॅगन फ्रुट, अवोकॅडो व स्ट्रॉबेरी लागवड
१. ड्रॅगन फ्रुट -
ड्रॅगन फ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातिल फळ असून यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण तसेच फॉस्फरस व कैल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे टिकून राहतात. या पिकामध्ये किड रोगाचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत या पिकाची लागवड करण्यास 2021-22 पासून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
२. अवोकॅडो-
अवोकॅडोला अलिगेटर प्रअर, बटर फ्रूट, सोल्जर्स बटर (लॅटिन नाव-पसिया अमेरीकाना; कुळ/फॅमिली-लॉरेसी) असे म्हणतात. हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील फळझाड आहे. अवोकॅडो हे एक उष्ण कटीबंधीय फळ आहे. हे आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असल्यामुळे याला 'सुपरफ्रुट' असा दर्जा देण्यात आला आहे. अवोकॅडोला मख्खन फळ (बटरफ्रूट) असेही म्हणतात. अवोकॅडो हे सर्वाधिक पोषणमुल्य असलेले फळ आहे. (२४५ कॅलरी / १०० ग्रॅम) सौंदर्य प्रसाधने तयार करतांना अवोकॅडो फळातील स्निग्ध पदार्थाचा वापर होतो. तसेच अवोकॅडोचा वापर सँडविच, सॅलड, मिल्कशेक व आईस्क्रिम बनविण्यासाठी केला जातो. अवोकॅडोमध्ये सफरचंदाच्या तिप्पट प्रथिने आहेत.
३. स्ट्रॉबेरी-
स्ट्रॉबेरी हे समशितोष्ण हवामानातील फळपिक आहे. हे फळ शक्तिवर्धक व स्वादिष्ट असून या फळामध्ये औषर्धी गुणधर्म आहेत. या फळपिकाखालील क्षेत्र सातारा जिल्हयातील महाबळेश्वर सोबतच वाई, जावळी व पाटण या तालुक्यात देखील स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढत आहे. तसेच, राज्यातील इतर जिल्हयातही नाशिक, अमरावती, गडचिरोली इ. स्ट्रॉबेरी फळपिकाची लागवड करण्यात येत आहे.
अर्ज कुठे करावा-
https://mahadbt.maharashtra.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळते. निवड झाल्यानंतर ७ दिवसात कागदपत्र अपलोड करावी लागतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे पूर्वसंमती देतात. सहाय्यक कृषी अधिकारी हे अंदाजपत्रक तयार करतात. मंडळ कृषी अधिकारी हे तांत्रिक मान्यता देतात तर तालुका कृषी अधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात. पूर्वसंमती मिळाल्यापासून १५ दिवसात काम सुरु करावे व पूर्वसंमतीपासून ३ महिन्याच्या आत पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यानंतर देयके अपलोड करावीत. मंडळ कृषी अधिकारी हे प्रपत्र-३ मध्ये मोका तपासणी करतात व जिओटॅग फोटो महाडीबीटी प्रणालीवर अपलोड करतात. तालुका कृषी अधिकारी हे मोका तपासणी नुसार प्रपत्र-४ मध्ये प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करतात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून SNA Sparsh प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले जाते.
आवश्यक कागदपत्रे-
agristack शेतकरी नोंदणी क्रमांक
सामायिक 7/12 असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
विहित नमुन्यातील हमी पत्र (प्रपत्र-१)
अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता काय असावी-
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
अनुदान किती व कधी मिळते-
फळपीक | लागवड अंतर | प्रति हेक्टर आवश्यक रोपे | मापदंड (रु.) | सर्वसाधारण क्षेत्रासाठी ४० टक्के अनुदान (रु.) | अनुसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के अनुदान (रु.) |
ड्रॅगनफुट | ४.५ x ३ मी. | २९६० | ४४९९२० | १७९९६८ | २२४९६० |
| ३.५ x ३ मी. | ३८०८ | ५७८८१६ | २३१५२६ | २८९४०८ |
| ३ x ३ मी. | ४४४४ | ६७५००० | २७०००० | ३३७५०० |
अवोकॅडो | ५ x ५ मी. | ४०० | १००००० | ४०००० | ५०००० |
| ५ x ४ मी. | ५०० | १२५००० | ५०००० | ६२५०० |
स्ट्रॉबेरी |
|
| २००००० | ८०००० | १००००० |
अनुदान कोणत्या बाबींसाठी मिळते-
ड्रॅगनफुटची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, खते व पीक संरक्षण या बाबींसाठी अनुदान देय आहे.
अवोकॅडो लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, खते व पीक संरक्षण या बाबींसाठी अनुदान देय आहे.
स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, मल्चिंग या बाबींसाठी अनुदान देय आहे.
वरील तिन्ही फळपिकांसाठी अनुदान हे ठिबक विरहित असून ठिबक सिंचन चा लाभ प्रति थेंब अधिक पीक या योजनेतून शेतकरी घेऊ शकतात.
एका लाभार्थीस किती क्षेत्रापर्यंत लागवडी साठी अनुदान मिळते -
एका लाभार्थीस किमान ०.२० हेक्टर आणि कमाल २ हेक्टर पर्यंत लागवड करता येते आणि अनुदानाचा लाभ घेता येतो.सदर लागवड ही सलग क्षेत्रावर करणे बंधनकारक आहे.
लागवड किती अंतरावर करावी-
ड्रॅगनफुट लागवडीसाठी 0.60x 0.60x 0.60 मी आकाराचे खडड़े खोद्णे आवश्यक आहे.
लागवड ही 4.5x 3 मी. किंवा 3.5x 3 मी. किंवा 3x 3 मी.या अंतरावर करावी.
लागवड 4.5 x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 2960 रोपे, 3.5x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 3808 रोपे आणी 3x 3 मी अंतरावर केल्यास हेक्टरी 4444 रोपे लागतात.
अवोकॅडो लागवडीसाठी १.५ x१.५ x १.५ मी आकाराचे खडड़े खोद्णे आवश्यक आहे.
लागवड ही ५x ५ मी. किंवा ५ x ४ मी. अंतरावर करावी.
स्ट्रॉबेरी लागवड- दोन ओळी पद्धतीच्या लागवडीसाठी ९० ते १०० सेमी रुंद व ४५ सेमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. त्यावर दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर ३० सेमी असावे. या पद्धतीत प्रति हेक्टर ५०६१६ रोपे लागतात.
लागवडीसाठी लागणारी रोपे कुठून खरेदी करावीत-
लागवडीसाठी रोपे पुढील प्राथम्यक्रमाने शेतकरी यांनी खरेदी करावीत-
१.राष्ट्रीय बागवानी मंडळाकडील मानांकीत रोपवाटीका
२. कृषी विभाग रोपवाटीका
३. कृषी विद्यापीठ रोपवाटीका
४. आयसीएआर संस्थासंलग्न कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटीका
५. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटीका
६.सामाजीक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागांच्या रोपवाटीका
वरील ठिकाणी उपलब्ध नसल्यास नोंदणी कृत मान्यता प्राप्त खाजगी रोपवाटीकेतून घ्यावीत.
अधिक माहिती साठी-