Total Pageviews

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान NMNF

 राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान


राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे कोणते अभियान आहे ?


केन्द्रीय मंत्रीमंडळाच्या दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत भारत सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) या अभियानास  केंद्र पुरस्कृत योजना म्हणून मंजुरी दिली आहे .केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषि विकास योजना-भारतीय प्राकृतिक कृषि पद्धती ची उपयोजना म्हणून हे अभियान आहे. 

हे अभियान राबविण्यासाठी केंद्र शासनाचा  ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा राहणार आहे. 

हा एकूण दोन वर्षाचा कार्यक्रम आहे. दोन वर्षासाठी रु. २४८१ कोटी इटकी आर्थीक तरतूद करण्यात आलेली आहे. देशात १५००० समूह (clusters) तयार करून प्रति समूह ५०  हेक्टर याप्रमाणे ७.५ लाख हेक्टर वर हे अभियान राबवण्यात येणार आहे . प्रती समूह  ५० हेक्टर क्षेत्रातील १२५ शेतकरी यांना लाभ देण्यात येणार आहे.

आपल्या राज्या साठी १७०९ समूह चे म्हणजेच ८५४५०  हेक्टरचे लक्षांक आहे. अशा प्रकारे  देशात १५००० समूह  म्हणजेच  १८.७५ लाख शेतकरी या अभियानात समाविष्ट केले जाणार आहेत. आणि  या अभियानात  समाविष्ट शेतकरी यांनी स्वत: तर नैसर्गीक शेती करायचीच आहे पण त्याच बरोबर इतर ६ शेतकरी यांना प्रवृत्त करायचे आहे. अशा प्रकारे देशात  १ कोटी १२लाख ५० हजार शेतकऱ्यांपर्यंत  हे अभियान पोहोचणार आहे.


नैसर्गिक शेती म्हणजे काय?

नैसर्गिक शेतीची व्याख्या "रसायन -मुक्त शेती आणि पशुधनावर आधारित शेती  " अशी केली जाऊ शकते. ही एक वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा समावेश असलेली शेती प्रणाली आहे जी भारतीय परंपरेत रुजलेली आहे आणि ही शेती  पिके, झाडे आणि पशुधन यांचा समन्वय साधते.  

नैसर्गिक शेतीची वैशिष्ट्ये-
१.नैसर्गिक शेती मध्ये रासायनिक निविष्ठा तर वापरल्या जात नाहीतच पण इतर सुद्धा कोणत्याही बाह्य निविष्ठा वापरल्या जात नाहीत किंवा खरेदी केल्या जात नाहीत. पशुधन पासून  (शक्यतो देशी गायीची जात) मिळालेल्या शेण-मूत्र पासून विविध पदार्थ   उदा. जमीन सुधारणेसाठी जीवामृत,घनजीवामृत, बीजप्रक्रीयेसाठी बीजामृत चा वापर केला जातो.
२. नैसर्गिक शेती मध्ये स्थानिक बियाणे/ स्थानिक वाणांचा वापर केला जातो. ,
३. पिकांच्या अवशेषाने जमीनीवर  आच्छादन केले जाते जेणेकरून अन्नद्रव्यांचा पुनर्वापर व्हावा आणि उपयुक्त  सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण  तयार व्हावे. 

४. मिश्र पिके घेतली जातात, वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून वैविध्यता जपली जाते.धुळ पेरणी केली जाते.  

५. कीड नियंत्रणासाठी शेतातील वनस्पतिजन्य पदार्थांचा  वापर केला जातो  (जसे की नीमस्त्र, अग्निस्त्र, निबोळी  अर्क , दशपर्णी अर्क  इ.);




नैसर्गिक शेती व सेंद्रीय शेती यामध्ये काय फरक आहे?

1. नैसर्गिक शेती ही पशुधनावर आधारीत शेती पद्धती आहे. मात्र सेंद्रीय शेती ही पशुधन आधारीतच असली पाहिजे असे बंधन नाही. 

2. नैसर्गिक शेती मध्ये रासायनिक निविष्ठा तर वापरल्या जात नाहीतच पण इतर सुद्धा कोणत्याही बाह्य निविष्ठा वापरल्या जात नाहीत किंवा खरेदी केल्या जात नाहीत. पशुधन पासून  (शक्यतो देशी गायीची जात) मिळालेल्या शेण-मूत्र पासून विविध पदार्थ उदा. जमीन सुधारणेसाठी जीवामृत,घनजीवामृत, बीजप्रक्रीयेसाठी बीजामृत चा वापर केला जातो. याउलट सेंद्रिय शेती मध्ये बाह्य निविष्ठा बाजारातून खरेदी करून वापरल्या जातात उदा. गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते ,जिवाणू खते-अझोटोबैक्टर, रायझोबियम इ. 

3. नैसर्गिक शेतीमध्ये बाह्य निविष्ठा न वापरल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. सेंद्रिय शेतीमध्ये बाह्य निविष्ठा खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. 

3. नैसर्गिक शेती ही स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांवर आधारीत आणि भारतीय परंपरेत रुजलेली रसायन-मुक्त शेती आहे. मात्र सेंद्रीय शेती ही रसायनांचा वापर टाळून केलेली शेती पद्धती आहे. 

4. नैसर्गीक शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी शेतात उपलब्ध वनस्पतिजन्य अर्कांचा पीक संरक्षणासाठी   वापर केला जातो  (जसे की नीमस्त्र, अग्निस्त्र, निबोळी  अर्क , दशपर्णी अर्क  इ.). सेंद्रिय शेतीमध्ये  जैविक नियंत्रण केले जाते. उदा. ट्रायकोग्रामा कार्ड,ट्रायकोडर्मा,अशा सारख्या  बाह्य निविष्ठा सुद्धा खरेदी करून पीक संरक्षण केले जाते. 

5. नैसर्गिक शेती मध्ये अन्नद्रव्ये देण्यासाठी कोणतेही खनिज पदार्थ वापरले जात नाहीत. सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीला अन्नद्रव्ये देण्यासाठी खनिज पदार्थ वापरले जातात. उदा. रॉक फॉस्फेट, गंधक इ. 

6.नैसर्गिक शेतीमध्ये सूक्ष्म जिवाणूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. सेंद्रीय पद्धतीमध्ये बाह्य सेंद्रीय खते वापर केला जातो. 

7. नैसर्गिक शेतीमध्ये जमिनीची सुपिकता आणि पर्यावरणाचे संतुलन यावर अधिक भर दिला जातो. पर्यावरणातील बदलाला अनुकूल अशा पद्धतीने ही  शेती आहे.  सेंद्रिय शेतीत मात्र बाह्य निविष्ठा वापरल्या जात असल्यामुळे पर्यावरणीय बदलाला अनुकूलता कमी आहे. 

8. सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश हा रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर टाळून उच्च प्रतीचे अन्न उत्पादन करणे हा आहे. नैसर्गिक शेतीचा उद्देश हा निसर्गाच्या नियमानुसार शेती करणे हा आहे. यात कमीत कमी हस्तक्षेप आणि नैसर्गिक प्रक्रियांचा वापर करण्यावर भर दिला जातो. 

9.नैसर्गिक शेती मध्ये जिवंत किंवा मृत पालापाचोळा आच्छादन म्हणून वापरले जाते. सेंद्रिय शेती मध्ये प्लास्टिक मल्चिंग केले जाते.

10. सेंद्रिय शेतीमध्ये खत आणि कंपोस्ट यांचे योग्य विघटन  होण्यासाठी  ते जमिनीत मिसळावे लागतात. मात्र नैसर्गिक शेतीमध्ये सूक्ष्म जंतू आणि गांडूळे यांच्याद्वारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावरच प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे हळूहळू मातीमध्ये पोषण वाढते. 

11. नैसर्गिक शेती ही नैसर्गिक प्रक्रियांशी जुळवून घेणारी, मानवी हस्तक्षेप कमी असणारी, जैवविविधतेला चालना देणारी शेती आहे. सेंद्रिय शेती मध्ये बाह्य सेंद्रिय पदार्थांचा वापर असल्यामुळे नैसर्गिक  शेतीपेक्षा मानवी हस्तक्षेप जास्त आहे.



नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत ?

मातीची जडणघडण सुधारते. मातीतील अन्नद्रव्ये वाढतात. मातीतील सेंद्रिय कर्ब  वाढतो तसेच मातीची पाणी धारण ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीस मदत होते. जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारते. पर्यावरण संरक्षण होते . शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन  उत्पन्नात वाढ होते . रोजगार निर्मिती होते . पाण्याचा कमी वापर होतो . मानवाला विषमुक्त अन्न मिळाल्यामुळे  मानवाचे आरोग्यासाठी ही चांगली शेती आहे . 


राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची  उद्दीष्टे काय आहेत? 

१. शेतावरच जैव-निविष्ठा तयार करुन निविष्ठा खरेदीवरील खर्च कमी करणे. जमिनीचे आरोग्य सुधारणे. 

२. पशुधन आधारीत  (शक्यतो स्थानिक गायीची जात) एकात्मिक कृषी-पशुपालन मॉडेल लोकप्रिय करणे .

३. ICAR संस्था, कृषि विज्ञानं केंद्र, कृषि विद्यापीठे यांच्या शेतावरील  कृषि पर्यावरणीय संशोधन व ज्ञान आधारित विस्तार पद्धती बळकट करणे.

४.नैसर्गिक शेती करणारे शेतकरी यांचे अनुभवाचा उपयोग स्थानिक  नैसर्गिक शेती पद्धती (Package of Practices) विकसित करणे.

५ . नैसर्गिक शेतीतुन  तयार झालेले रसायन-मुक्त उत्पादन यासाठी  प्रमाणके (Common Standards) आणि शेतकऱ्यांना सोयीची अशी प्रमाणीकरण पद्धती (Certification Procedures) विकसित करणे.

६. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या रासायनिक मुक्त उत्पादनांसाठी एकच राष्ट्रीय ब्रँड तयार करणे आणि त्याचा प्रचार करणे.

या अभियानात सहभाग कोण घेऊ शकतात?

या अभियानात नजीकच्या १ ते ३ ग्रामपंचायती मधील शेतकरी एकत्र येऊन या अभियानात सहभागी होवू शकतात.सर्वांचे मिळून ५० हेक्टरचे क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येणे आवश्यक आहे. हे ५० हेक्टरचे क्षेत्र म्हणजेच एक समूह किंवा क्लस्टर.  प्रति शेतकरी कमाल एक एकर पर्यंत  क्षेत्रासाठी या अभियानात लाभ घेऊ शकतात.  

हा ५० हेक्टर चा समूह निवडण्यासाठी निकष  काय आहेत? 

हा ५० हेक्टरचा समूह निवड करण्यासाठी प्राधान्य बाबी  पुढीलप्रमाणे आहेत -

१. गंगा नदीच्या किनाऱ्या लगत ५ किमी कॉरीडॉर असलेले जिल्हे 

२. प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे 

३. जास्त खत वापर असलेले जिल्हे 

४. कमी खत वापर असलेले जिल्हे 

५. आदिवासी उपयोजना अंतर्गत असलेले तालुके-जिल्हे 

६. ज्या जिल्ह्यात ग्रामीण उपजीविका अभियान, प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघ आणि इतर समूह आधार संस्था यांचे प्रमाण जास्त आहे. 

ज्या क्षेत्रात नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत अशा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येते .

या ५० हेक्टरच्या समुहातील शेतकरी यांना या अभियाना संदर्भात मार्गदर्शन कोण करणार?

एका समुहासाठी (म्हणजेच ५० हेक्टर क्षेत्रातील १२५ शेतकरी) दोन कृषि सखी ग्रामपातळीवर नेमण्यात येणार आहेत. या कृषी सखींना 5000 रु प्रती महिना इतके मानधन देण्यात येणार आहे.




कृषि सखी नेमणुक करण्यासाठी काय पात्रता लागते व् नेमणुक कुणामार्फ़त होते ?

१. कृषि सखी स्वयंसहायता गटाची सदस्य असणे  आवश्यक आहे . 

२. किमान ७ वी पास असावी. संभाषण कौशल्य असावे. 

३. नैसर्गिक शेती करण्याची इच्छा असावी. 

कृषि सखीची नेमणुक मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सनियंत्रण समिति  मार्फ़त संबंधित ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने होते. 

शेतकरी यांना या अभियानाचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे?

नैसर्गिक शेती करण्यासाठी  शेतकरी  प्रति एकर प्रति वर्ष रु. ४००० इतके अनुदान देण्यात येणार आहे. असे दोन वर्षात  एकूण ८००० रु. इतके अर्थसाह्य मिळणार आहे.  यासाठी शेतकरी यांना नैसर्गिक शेती करणे, इतर ६ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, पशुधन संगोपन, शेतावरच निविष्ठा तयार करणे , या बाबी कराव्या लागणार आहेत. 

तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि  नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण करणेसाठी शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांना प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी देण्यात येणार आहे?

शेतकरी यांना प्रशिक्षण गाव पातळीवर , तसेच कृषी विज्ञान केंद्र/कृषी विद्यापीठ/स्थानिक नैसर्गिक शेती संस्था या ठिकाणी १ दिवसीय दोन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. यासाठी प्रति शेतकरी १२५ रु. प्रति दिन इतकी तरतूद आहे. तसेच शेतकरी तज्ञ प्रशिक्षक यांच्यामार्फत नैसर्गिक शेतीच्या प्रात्यक्षिक प्लॉट वर सुद्धा १ दिवसीय २ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रु. २० प्रति शेतकरी प्रति दिन  इतकी तरतूद आहे. 

शेतकरी तज्ञ प्रशिक्षक म्हणजे काय?

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत. उदा. कृषी विज्ञान केन्द्र ,कृषी विद्यापीठ आणि स्थानिक नैसर्गिक शेती संस्था. या प्रत्येक संस्थेच्या प्रक्षेत्रावर किमान 1 एकर चा नैसर्गिक  शेती चा प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात येणार आहे. आणी या प्रत्येक कृषी विज्ञान केन्द्राने स्वत:च्या क्षेत्रावरच नाही तर कार्यक्षेत्रातील 3 शेतकरी यांच्या प्रत्येकी 1 एकर क्षेत्रावर नैसर्गीक शेतीचे प्रात्यक्षिक प्लॉट करायचे आहेत. यासाठी  50000 रु.प्रती प्लॉट अर्थसाह्य देण्यात येणार आहे. आणी हे  ४ प्रात्यक्षिक प्लॉट ला तयार करण्यासाठी  एका शेतकरी तज्ञ प्रशिक्षक (Farmer Master Trainer) ची नेमणूक या प्रत्येक प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी  केली जाणार आहे.शेतकरी तज्ञ प्रशिक्षक हे कृषी सखींना तसेच क्लस्टर मधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा उदा. जीवामृत, बीजामृत इत्यादी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून प्रशिक्षण देणार  आहेत आणि नैसर्गिक शेतीची अंमलबजावणी होत आहे याची खात्री करणार आहेत . या शेतकरी तज्ञ प्रशिक्षक यांना 6200 रु प्रती महिना इतके मानधन दिले जाणार आहे. 

शेतकरी तज्ञ प्रशिक्षक म्हणून नेमूणक होण्यासाठी पात्रता काय आहे?

१. शेतकरी हे किमान ३ वर्ष नैसर्गिक शेतीचा अवलंब करत असावे. 

२. किमान ७ वी पास असावे . संभाषण कौशल्य असावे. प्रशिक्षण देण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य. 

३. प्रशिक्षण संस्था ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्यातील रहिवासी असल्यास प्राधान्य.  शेतकरी तज्ञ प्रशिक्षक नेमणुक प्रशिक्षण संस्थेमार्फत मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सनियंत्रण समिति  च्या सल्ल्याने  होते. 



स्थानिक नैसर्गिक शेती संस्था म्हणजे काय -

ज्याप्रमाणे कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्याच प्रमाणे नैसर्गिक शेतीचा अवलंब करणारे शेतकरी सुद्धा इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतात त्याचप्रमाणे खाजगी नैसर्गिक शेती प्रशिक्षण  केंद्र आहेत तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट (उदा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गट इ.) हे  स्थानिक नैसर्गिक शेती संस्था (Loca; Natural Farming Institution–LNFI) म्हणून काम करू शकतात.  या प्रशिक्षण संस्थेला शासनामार्फत  ५०००० रु.अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

तसेच या प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी क्लस्टर मधील १२५ शेतकरी यांना प्रशिक्षण द्यायचे आहे. दोन वर्षात एक दिवसीय २ प्रशिक्षण घ्यायचे आहेत. प्रती प्रशिक्षणार्थी प्रती दिन १२५ रु तरतूद आहे. असे एकुण एका क्लस्टर साठी 125 शेतकरी×125 रु प्रती दिन x २ प्रशिक्षण= ३१२५०  रु.मैनेज हैद्राबाद या संस्थमार्फत  मिळणार आहेत.

स्थानिक नैसर्गिक शेती संस्था निवडीचे निकष  काय आहेत-

१. नैसर्गिक शेती करणारा शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट  असावा किंवा नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण केंद्र असावे. 

२. नैसर्गिक शेती चे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र असावे. नैसर्गिक शेतीबाबत प्रशिक्षण देण्याचा पूर्वानुभव असणे आवश्यक. 

३. किमान ३ वर्ष नैसर्गिक शेतीचा अवलंब करत असावे. 

४. जे किमान २ वर्षांपासून नैसर्गिक शेती करत आहेत आणि त्यांचेकडे नैसर्गिक शेतीचा प्रात्यक्षिक प्लॉट आहे असे  किमान १० शेतकरी या स्थानिक नैसर्गिक शेती संस्थेशी जुळलेले असावेत. 

५. किमान ५० प्रशिक्षणार्थी यांचेसाठी प्रशिक्षण सुविधा असणे आवश्यक (दृकश्राव्य उपकरणे, प्रशिक्षण हॉल)

जिल्हा स्तरीय सनियंत्रण समिती ही तालुका स्तरीय सनियंत्रण समिती, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांच्या समन्वयाने स्थानिक नैसर्गिक शेती संस्था यांची निवड करते. 


या अभियानाची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या समित्या कोणत्या आहेत-


जिल्हास्तरावर मा.  जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती आहे. या समितीचे सदस्य सचिव हे प्रकल्प संचालक आत्मा आहेत. 

तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय सनियंत्रण समिती आहे. याचे सदस्य सचिव हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी आहेत. 


या अभियानात सहभागी होण्यासाठी संपर्क कुणाकडे करावा-

या अभियानात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, तसेच तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत स्तरावर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेशी  संपर्क करावा. 




एका समुहासाठी  उपलब्ध  तरतूद व घटकनिहाय मापदंड काय आहेत?


५० हेक्टरच्या  एका समुहासाठी म्हणजेच १२५ शेतकरी यांचेसाठी एकूण दोन वर्षासाठी रु. १३.९९ लाख इटकी तरतूद आहे. 

एका समुहासाठी (५० हेक्टर, १२५ शेतकरी)उपलब्ध घटकनिहाय तरतूद-


अ. क्र. 


तपशील 

दोन वर्षासाठी एकूण तरतूद (रु. लाख)

१ 

कृषि सखी मानधन शेतकरी प्रशिक्षण,विस्तार व दस्तऐवजीकरण यासाठी आउटपुट आधारित प्रोत्साहन

५००० प्रती महिना x २ कृषी सखी=१०००० रु. X १२ महिने= १.२० लाख x २ वर्ष= २.४० लाख.


२.४० 

२ 

अभियान बाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती कार्यक्रम - ग्रा.पं. स्तर ५० शेतकरी (ग्रा.पं. सदस्य, स्वयंसहायता गट महिला सदस्य, शेतकरी ई.)

४ कार्यक्रम प्रति वर्ष  x रु. २००० प्रति कार्यक्रम  = रु.८००० प्रति वर्ष  x २ वर्ष = रु.०.१६ लाख   

०.१६ 

नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकरी यांना प्रोत्साहनपर  अर्थसाह्य 

रु.४००० प्रति एकर प्रति वर्ष  x १२५ शेतकरी प्रति समूह = रु. ५ लाख  x २ वर्ष = रु. १० लाख . 

१०

नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण

रु.२१०० प्रति हेक्टर x ५०  हे..=रु.१.०५लाख 

१.०५

शेतकरी यांचेसाठी अभिमुखता कार्यक्रम (Orientation program) 

२५ शेतकरी प्रति कार्यक्रम -रु.१२०० प्रति कार्यक्रम  × 2 कार्यक्रम प्रति वर्ष = रु.  २४००x २ वर्ष = ०.०४८लाख .) 

०.०४८

नैसर्गिक शेती बाबत अभ्यास साहित्य,शेतकरी डायरी,वारंवार विचारले जाणारे प्रश्न बाबत इ. साठी

रु.२०० प्रति शेतकरी  x १२५  शेतकरी प्रति समूह = ०.२५ लाख 

(अभ्यास साहित्य - रु.१०० , शेतकरी डायरी-रु.५०, FAQ पुस्तिका-रु.५०)

०.२५

कृषी सखी यांना मोबाईल उपकरण  साठी सहाय्य  

रु. ४००० x २ कृषी सखी = ०.०८ लाख .

०.०८


एकूण 


१३.९८८


अधिक माहितीसाठी -


शासन निर्णय दि. ३-२-२०२५


वेबसाईट-

https://naturalfarming.dac.gov.in/NaturalFarming/Concept


केंद्र शासनाच्या इंग्रजी मार्गदर्शक सुचना दि. १०-२-२०२५