Total Pageviews

शेतीशाळा

शेतीशाळा-

शेतीशाळा म्हणजे काय ?
शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेतिशाळा आहे. शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे  एक एकर चे क्षेत्र निवडले जाते. या क्षेत्रावरच  गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत  एकत्र येतात व  पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था उदा. पेरणीपुर्व, पेरणी, शाकीय वाढ, फुले लागणे, दाणेभरणे/बोंडे लागणे, पक्वता तोडणी काढणीपश्चात अशा महत्वाच्या अवस्थेमध्ये एकुण ६ वर्ग शेतावरच आयोजित होतात. एक वर्ग किमान ४ तासाचा असतो. या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यामध्ये एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ .बाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येउन आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव, चांगले/वाईट दृश्य परिणाम एकमेकांना सांगतात. आपापसात चर्चा करतात व प्रात्यक्षिक प्लॉट ची निरीक्षणे घेतात. किडीची चित्रे काढतात. थोडक्यात हा प्रात्यक्षिक प्लॉट म्हणजेच पाटी, पुस्तक, पेन, इमारत सर्व काही असते.
या शेतीशाळे साठी प्रशिक्षक म्हणून कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे असतात. तसेच कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ  तसेच रिसोर्स बैंक शेतकरी यांनाही आमंत्रित केले जाते. ज्या शेतकरी यांचे शेतात ही शेतीशाळा घेतली जाते तो शेतकरी म्हणजे होस्ट फार्मर. 

शेतिशाळे ची मूलतत्वे व ऊद्देश-
1. निरोगी व सशक्त पिक जोपासणे साठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे. यामध्ये शेतकरी यांना फक्त शिकवणे हा ऊद्देश नाही तर शेतकरी यांना कर्यक्रमामध्ये सामावुन घेणे हा ऊद्देश आहे.
2. किडीच्या नैसर्गिक शत्रूंचे अर्थात आपल्या मित्र किटकांचे संवर्धन करणे.
3. नियमित पणे निरीक्षणे घेणे, निरिक्षणा वर आधारित निर्णय घेणे आणि शेतकरी यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे.
4. शेतकरी यांना एकात्मिक पिक व्यवस्थापन आणि किड/रोग व्यवस्थापन यामध्ये तज्ञ बनविणे.
5. शेतकरी समूह एकत्र येणे आणि त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबवणे.



होस्ट फार्मर बाबत व प्लॉट बाबत-
1.होस्ट फार्मर शेतकरी हा प्लॉट वर सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास उत्सुक असावा. 
2.सदर शेतकरी यांनी प्लॉट मध्ये वापरण्यात आलेल्या निविष्ठा, पिक उत्पादन खर्च तसेच इतर सर्व बाबींच्या नोंदी करणे आवश्यक आहे.
3. शेतिशाळा प्लॉट धारकाकाडे संरक्षित सिंचनाची सुविधा असणे अभिप्रेत आहे. 
4.शेतिशाळा प्लॉट हा शक्यतो रस्त्यालगत असावा जेणेकरुन इतर शेतकरी यांना येणे सोयीचे होइल.
5. शक्यतो क्रॉप सैप अंतर्गत निवडलेले गावामध्ये एका प्रमुख पिकासाठी फिक्स प्लॉट निवडून शेतिशाळेचे आयोजन या प्लॉट वर करण्यात येते.
6. शेतिशाळा प्लॉटवरिल तंत्रज्ञानाचा तौलनीक अभ्यास करता यावा आणि शेती शाळेतील शेतकरी यांना सदर तंत्रज्ञान अवलंब करण्याबाबत निर्णय घेता यावा यासाठी शेतिशाळा प्लॉट शेजारीच नियंत्रीत प्लॉट निवडण्यात येतो. 
7. पिक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात सदर प्लॉट वर शेतिदिना चे आयोजन करण्यात येते. यासाठी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यात येते.

गाव निवड  व पिक निवड बाबत-
1. प्रत्येक कृषी सहय्यकाच्या कार्यक्षेत्रात एक गाव निवडले जाते व या गावात प्रमुख पिकाकरीता शेती शाळेचे आयोजन करण्यात येते.  
2. प्रमुख पिक निवड करताना खरीप व रबी हंगामामध्ये त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पेरणी होणार्या क्षेत्रापैकी 70 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होणारे जे पिक असते ते प्रमुख पिक होय. 
3.महिला कर्मचारी हे महिला शेतकरी यांचे साठी शेतिशाळेचे आयोजन करतात. 
4. शेती शाळेसाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य उदा. रजिस्टर, फुटपट्टी, कोरे व ड्राइंग कागद, स्केच पेन सेट, 10x भिंग, लहान व्हायल्स इ . साहित्य शेतकरी यांना देण्यात येते.


शेतिशाळा घ्यावयाची पिके (क्रॉपसैप प्रकल्पांतर्गत)-
कोंकण विभाग- भात
नाशिक पुणे कोल्हापुर नागपुर विभाग- भात, कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उस, रबी हरभरा.
छत्रपती संभाजीनगर, लातूर अमरावती विभाग- वर नमुद सर्व पिके (भात वगळून)
खरीप व रब्बी हंगामात उपरोक्त पिकांच्या पीकनिहाय शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात.

शेतिशाळे साठी बाबनिहाय खर्चाचे मापदंड-

१. प्रशिक्षण साहित्य व इतर तांत्रिक साहित्य (प्रती शेतकरी रु.२००x २५ शेतकरी)-  रु. ५०००/-
२. अल्पोपहार ( रु.२० प्रती शेतकरी x २५ शेतकरी x ६ वर्ग) - रु. ३०००/-
३. शेती दिन खर्च- रु. 2000/-
४. विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे- रु.१०००/-
५. कृषी विज्ञान केंद्र यांचेद्वारे मूल्यमापन-१०००/-
६. व्याख्यात्यांचे मानधन (५०० रु. x २ व्याख्याते प्रति वर्ग)- १०००/- 
याप्रमाणे एकुण तरतूद रु.१३०००/- इतकी आहे.

शेतिशाळे चे फायदे-

1. शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा कर शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.
2. शेतिशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनतात. उदा. बियाणे,मशागत पद्धती, कोणत्या घ्याव्यात याबाबत निर्णय ते स्वत: घेऊ शकतात.
3. शेतकरी शत्रु किड व मित्र कीटक ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकरी हा शेतात कोणत्याही प्रकारचा कीटक दिसला की तो पिकाचा शत्रु समजून फवारणी घेणे हा पर्याय निवडतो. परंतू शेतिशाळेचे प्रशिक्षण घेतलेला शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो.
4. शेतिशाळेचे शेतकरी हे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत दक्ष राहतात. पर्यायाने उत्पादन खर्च कमी होवुन शेतकरी यांचा फायदा होतो. 
5. छोट्या छोट्या गटात काम केल्याने सहकार्याची भावना वृद्धींगत होते.
6.पिक निहाय तंत्रज्ञान आणि त्या संबंधीत कौशल्ये शेतकरी यांचे पर्यंत प्रभावी पणे पोचतात.

उत्कृष्ट शेतिशाळा आयोजन स्पर्धा-

उत्कृष्ट शेतिशाळा स्पर्धा आयोजित केल्याने कर्मचारी यांचे मध्ये खिलाडू वृत्ती वाढुन त्यांच्या मधिल सुप्त गुणां ना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा, विभाग  स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामुळे कर्मचारी यांचे मध्ये उत्साहाची भावना निर्माण होते व योजनेचा उद्देश सफल होण्यास मदत होते. जिल्ह्यातील स्पर्धे मध्ये सहभागी होवू इच्छिणारे  कृषी सहाय्यक  यांचे अर्ज शेती शाळेच्या प्रथम टप्प्यात मागविण्यात येतात. शेतिशाळांचे मुल्यांकन करुन जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम करणारे कृषी सहाय्यक यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासाठी गुणांकन करण्यात येते. जिल्हास्तरावरील प्रथम मानांकित शेतीशाळे चा प्रस्ताव विभाग स्तरावर पाठविण्यात येतो.

अधिक माहितीसाठी-


                            ---××---